संग्रहित फोटो
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्डयाप्रकरणी कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शेतकरी तरुणाने एसीबीकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात निर्डे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सासवड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात गोविंद निर्डे वनरक्षक आहे. तक्रारदार तरुणाने पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. नंतर तक्रारदार तरुणाने खड्डा बुजविला. नंतर वनरक्षक निर्डे याने याप्रकरणात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली. त्यानंतर तक्रारदाराने तडजोडीत एक लाख रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सासवडमधील वीर फाटा परिसरात सापळा लावण्यात आला. निर्डे याने तक्रारदाराला एक लाख रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी बोलाविले. नंतर तक्रारदार तरुणाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना निर्डे याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, उपअधीक्षक भारती मोरे यांनी ही कारवाई केली.