गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा
गणेशोत्सवाच्या निम्मिताने अनेक मंडळं विविध देखावे उभारून त्याद्वारे सामाजिक संदेश देत असतात. ठाण्यात देखील मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. ठाण्यात एका मंडळाने दहशतवाद ठेचलाच पाहिजे म्हणत देशभक्तीचा संदेश दिला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ठाण्यातील आझाद नगर नं. २ येथील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने ३९ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९८७ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात. मागील वर्षी ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा “दहशतवाद ठेचलाच पाहिजे” हा देखावा साकारला आहे.
ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ यांच्यावतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २००२ सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, ११ जुलै २००६ रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, २६/११ मुंबई हल्ला तसेच १४ फेब्रुवारी २०१९ जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला. ज्यामध्ये ४० भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत.
त्याचबरोबर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती चलतचित्रांद्वारे दाखविण्यात आली आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे, तसेच यश मिळवून देणाऱ्या तीन महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे.
Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
यंदा मंडळातील गणेशमूर्तीच्या हातात शस्त्र दाखवून “दहशतवाद संपवला जात आहे” हे प्रतिकात्मक दृश्य उभारण्यात आले आहे. संपूर्ण सजावटीतून दहशतवादाविरुद्ध जागरूकता आणि देशभक्तीची प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे.
दहशतवाद पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे मंडळाने या देखाव्यातून शासनाला विनंती करण्यात आली आहे की आपल्या देशाच्या सीमा मजबूत करा तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना आर्मीचे शिक्षण द्या. जेणेकरून येणारी पिढी वेळप्रसंगी अतिरेक्यांशी युद्ध करून त्यांचा खात्मा करेल. तसेच अतिरेकांच्या हल्ल्याला बळी पडणार नाही.
याविषयी जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखाप्रमुख सतीश पवार, मंडळाचे कार्यकर्ते रिषभ धामणस्कर, विशाल गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली.