सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध करत आंदोलन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेचं ताफ्याजवळ काळे झेंडेही दाखविले.
पुणे विद्येचे माहेरघर मानले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोंढवा बलात्कार प्रकरण याबरोबरच दौंडमध्ये पालखी सोहळ्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याच्या धाकाने अत्याचार, स्वारगेट परिसरात बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर होत असलेले लैंगिक शोषण, या घटनांमुळे संपूर्ण पुणेकरांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्वतःच्या घरातसुद्धा सुरक्षित वाटू नये, अशी स्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. “गुन्हेगारांवर जेवढा पोलिसांचा धाक असावा, तेवढा धाक आज पुणेकरांवर निर्माण झाला आहे,” अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली. पोलिसांच्या अपयशाविरोधात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय व्हावेत, या मागणीसाठी मनसेने आंदोलन छेडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न करुन हे आंदोलन करण्यात आले.
मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
मनसेच्या तीव्र आंदोलनात पक्षाचे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र, आंदोलनाला थांबवण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर करत महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आले.
“लढा थांबणार नाही” – मनसेचा निर्धार
मनसेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “पुण्यातील महिलांवर होणारे अत्याचार व पोलिस प्रशासनाचे अपयश याविरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे. सरकारने जरी आम्हाला अडवले तरी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्ही रस्त्यावर उतरत राहू.”