तिहेरी अपघातात ६ ठार (संग्रहित फोटो)
मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. हायड्राक्रेन वाहनाच्या धडकेने एका ८० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच विलेपार्ले परिसरात घडली आहे. बिना अनिल मथुरे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.
महिलेच्या मृत्यूप्रकरणी क्रेन चालक अरविंद कमलेश यादव याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर अरविंद हा घटनास्थळाहून पळून गेला होता. रात्री शुक्रवारी उशिरा त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील इर्ला मार्केट, तानाजी मालुसरे मार्ग, प्राईम मॉलसमोर झाला आहे.
बिना मथुरे या महिला विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिसजवळील गणेश मूर्ती गार्डन शोरुमजवळ राहते. गुरुवारी दुपारी त्या इर्ला मार्केटमध्ये गेल्या होत्या. प्राईम म शोरुमसमोरुन जात असताना एका हायड्राक्रेन चालकाने हलगर्जीपणाने गाडी चालवून बिना यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर क्रेनचालकाने जखमी महिलेस कुठलीही वैद्यकीय मदत केली नाही.
पुण्यातील धक्कादायक घटना
हडपसरमध्ये मांजरी भागात घरासमोर खेळणारा तीन वर्षांचा मुलगा कारच्या चाकाखाली आला आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष्णू अमरीश जाधव (वय ३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अमरीश हनुमंता जाधव (वय २२, रा. विक्रम वाइन्स शेजारील गल्ली, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, चालक पिंटू भवरलाल माली (वय ३३, रा. घुलेनगर, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव यांचा तीन वर्षांचा मुलगा विष्णू २८ मार्च रोजी दुपारी घरासमोर खेळत होता. त्यावेळी कारच्या धडकेत विष्णू गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या विष्णूचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.