संग्रहित फोटो
कुर्डुवाडी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कामावरून घराकडे पायी जाताना खासगी सहकारी बँकेच्या महिला शाखाधिकाऱ्यांच्या गळ्यातील मिनी गंठण दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टेंभुर्णी रोडवरील एका खासगी हाॅस्पीटलसमोर ही घटना घडली. याबाबत शाखाधिकारी सुनीता हरिभाऊ साळुंके यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, साळुंके बँकेचे कामकाज आटोपून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराकडे जात असताना टेंभुर्णी रोडवरील एका खासगी हाॅस्पीटलसमोर काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन अनोळखी दोघे जण तोंडाला रुमाल बांधून आले. पाठीमागे बसलेल्या एकाने साळुंके यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम ९८० मिली वजनाचे २७ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण हिसकावून टेंभुर्णीच्या दिशेने धूम ठाेकली. साळुंखे यांनी आरडा ओरडा केला, परंतु तिथे कोणीच नव्हते. याबाबत साळुंके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी महिला दिनाच्या सायंकाळी एका शिक्षिकेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले होते. त्याचा अद्याप तपास लागला नसताना ही दुसरी घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याच्या दराने ९० हजारांचा टप्पा ओलांडल्याने दुचाकीस्वार चोरटे मोठा हात साफ करीत आहेत.