संग्रहित फोटो
पुणे : राज्यात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून घटना उघडकीस येत आहेत. यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. अशातचं आता सिगारेट मागण्याच्या बहाण्याने जवळ जावून तिघांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना कात्रज-देहूरोड बायपासवर नऱ्हे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
सागर शिरोळे, संग्राम मोरे आणि विराज भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जित पांडुरंग कांबळे (वय १८, रा. सातारा) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना तीन जानेवारीला पहाटे दोन ते चार या वेळेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र नऱ्हे परिसरातील ओमकार लॉज बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी तक्रारदार आणि त्याच्या मित्रांकडे सिगारेट मागण्याचा बहाणा केला. मुलांनी सिगारेट नसल्याचे सांगितले असता, आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला आणि जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तक्रारदार आरोपींच्या हातून निसटला. त्याने तेथून पळ काढला. मात्र, इतर दोन मुलांना आरोपींनी कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. कारमध्ये त्यांनी मुलांकडील तीन मोबाइल हिसकावून घेतले. त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर एका मुलाला अज्ञात स्थळी सोडले. तेथून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या मुलाला कारमधून उतरवले आणि ते पसार झाले.
दरम्यान, तक्रारदाराने या काळात सिंहगड रस्ता पोलिसांना संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. यामध्ये स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके देखील कामाला लागली होती. अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले; गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तोंडावर टाकला अन्…
पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तरुणाच्या चेहऱ्यावर लावून त्याच्याकडील ४३ हजारांची रोकड चोरुन नेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि साथीदारांनी चाकणणधील एका तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.