संग्रहित फोटो
पुणे : बाणेरमधील आयकॉन टॉवरसमोर असलेल्या केएफसी दुकानासमोर महालक्ष्मी पाणीपुरी हातगाडीवर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर विक्रेत्याने पैसे मागितल्याच्या रागातून त्याच्यावर दगडाने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याघटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. २२ मे रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली आहे.
याप्रकरणी विशाल हरीसिंग शर्मा (वय २०, रा. आंबादास कोकाटे चाळ, बालाजी चौक, सुस रोड, पाषाण, पुणे) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपींची नावे बालाजी मुटकुळे (वय २१), सत्यम निर्वळ (वय २०), व श्यामसुंदर बहेती (वय १९, सर्व रा. महाळुंगे, पुणे) अशी आहेत. याप्रकरणी बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शर्मा हे २२ मे रोजी रात्री १० वाजता आपल्या पाणीपुरीच्या हातगाडीवर व्यवसाय करत होते. त्यावेळी वरील आरोपी ग्राहक म्हणून आले. त्यांनी पाणीपुरी खाल्ल्यानंतर बिल देण्यास टाळाटाळ केली. शर्मा यांनी पैसे मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी “तुला दम निघत नाही का?” असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी एका आरोपीने खाली पडलेला दगड उचलून शर्मा यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.