संग्रहित फोटो
कराड : वारुंजी फाटा (ता. कराड) येथील गजानन पान शॉपसमोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन युवकांवर धारदार कटरने वार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुरज निवास सावंत (रा. सूर्यवंशी मळा, कराड) याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमकार विष्णू काटकर, साहिल संकपाळ, अरमान जमादार आणि सचिन येडगे (सर्व रा. आबईचीवाडी, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कराड शहरातील सूर्यवंशी मळा येथे राहणारा सुरज सावंत हा युवक प्लंबिंगचे कामे करतो. सोमवारी रात्री कामाचे पैसे आणण्यासाठी तो आणि त्याच्या मामाचा मुलगा प्रथमेश सूर्यवंशी हे दोघेजण दुचाकीवरून वारुंजी फाटा येथे गेले होते. कामाचे पैसे घेऊन ते परत येत असताना गजानन पान शॉप येथे दोघेजण पान खाण्यासाठी थांबले. काही वेळानंतर ते तेथून निघाले असताना ओमकार काटकर याच्या दुचाकीला सुरज सावंत याच्या दुचाकीचा धक्का लागला.
त्यावरून ओमकार काटकर याने चिडून जाऊन सुरज आणि प्रथमेश या दोघांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्याच्यासोबतच्या इतर तिघांनीही मारहाण करीत दमदाटी केली. यावेळी ओंकार काटकर याने त्याच्या खिशातील कटरने सुरज सावंत याच्या मानेवर, प्रथमेश सूर्यवंशी यांच्या पाठीवर वार केले. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस तपस करीत आहेत.