धक्कादायक ! गळा आवळून मजुराची हत्या; CCTV फुटेज समोर येताच झाला प्रकरणाचा उलगडा
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. निर्माणाधिन इमारतीत मजुरी करणाऱ्या धनसिंग दरमसिंग उईके (वय ३३, रा. छत्तरपूर, मध्यप्रदेश) यांचा मृतदेह गुरुवारी जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
सुरुवातीपासूनच ही घटना संशयास्पद होती. उत्तरीय तपासणी अहवालात धनसिंगचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासात धनसिंगची हत्या त्याच्यासोबत काम करणाऱ्या गणेश धुर्वे (वय ३०) नामक मित्रानेच केल्याचे समोर आले. गणेशने गळा आवळून धनसिंगची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. सध्या गणेश पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
धनसिंग आणि गणेश हे दोघेही मध्यप्रदेशातील असून, कामाच्या शोधात नागपुरात आले होते. सेंट्रल रेल्वे कॉलनीजवळील जयवंतनगरात गुल्लर यांच्या घराचे कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता गणेश धुर्वे रात्रीच्या अंधारात पळून जाताना दिसला. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी धनसिंग आणि गणेशमध्ये वाद झाला होता, ही बाब तपासात उघड झाली.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा सुगावा
उत्तरीय तपासणी अहवालात धनसिंगचा मृत्यू जळाल्याने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे समोर आले. दोघेही जवळपास १०-१५ दिवसांपासून बांधकाम करत होते आणि तेथेच राहत होते. १९ नोव्हेंबरच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास धनसिंगने कंत्राटदार श्याम चहांदे यांना फोन करून गणेश निर्माणाधिन इमारतीचा वीजपुरवठा खंडित करून गायब झाल्याची माहिती दिली आणि पहिल्या माळ्यावरील खोलीत झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अलीम नावाचा मिस्त्री कामावर आला असता धनसिंग बेडवरच जळालेल्या अवस्थेत आढळला. अलीमने घटनेची माहिती कंत्राटदार आणि पोलिसांना दिली.
हेदेखील वाचा : कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे विवाहितेची आत्महत्या; कुटुंबियांचा सासरच्यांवर गंभीर आरोप






