संग्रहित फोटो
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी अँटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता एसआयटीमार्फत दुर्घटनेमागील कारणे, संबंधितांची जबाबदारी आणि सुरक्षेतील त्रुटींचा सर्वंकष तपास केला जाणार आहे.
मोशी कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी कचऱ्याचा सुमारे सात मजली उंच डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू, तर, आठ जण जखमी झाले होते. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने चार दिवस प्रयत्न केले होते. या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
स्लीपिंग पार्टनर कनेक्शन बाहेर येणार का ?
मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाला शहरातील एका आमदाराच्या घरातील महिला, महापालिकेतील एका अधिकाऱ्याची पत्नी आणि पुण्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा मुलगा स्लीपिंग पार्टनर असल्याची चर्चा आहे. आता एसआयटी स्थापन झाल्याने संबंधित आमदार आणि त्याच्या भागीदारांचे कचरा डेपो दुर्घटना कनेक्शन बाहेर येणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : दुधातील भेसळीवर मुंढेंचा बुलडोझर? राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घेण्याची मागणी
पोलिस उपायुक्त प्रमुख
या एसआयटीचे प्रमुख पोलिस उपायुक्त राहणार आहेत. तसेच, दोन सहायक पोलिस आयुक्त, एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व एक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक, एक फौजदार आणि चार पोलिस अंमलदार यांचा या पथकात समावेश आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीकडून दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. -मारुती जगताप (पोलिस उपायुक्त – परिमंडळ तीन)






