अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?
बीड: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेले वाल्मिक कराड यांच्या आई पार्वताबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “माझा लेक देवमाणूस आहे, त्याला मुद्दाम अडकवले जात आहे. त्याला सोडेपर्यंत मी इथून हटणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यावर मकोका आणि कलम 302 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बीड आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परळीत वाल्मिक कराड यांना न्याय द्या, या मागणीसाठी त्यांच्या मातोश्री पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत असतानाच, कराड समर्थकांनी टाॅवरवर चढून आंदोलनही केले.
पार्वताबाईंच्या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. “कराड यांच्या आईला आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’असे कधीच म्हटले नसते.”
परळीत वातावरण तापलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमधून वाल्मिक कराडच्या आईलाही अनेक प्र्श्न विचारले आहेत. वाल्मिक कराडच्या आईला उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये, ” वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पहावा. आपल्याला काही प्रश्न.
काय म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी ?
१. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
२. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
४. संतोष मुंडे ह्याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ?
५. आवादा कंपनीचे लोक ह्यानी केलेला FIR खोटा आहे का ?
६. गोट्या गित्ते सारखी माणसं सदगृहस्त आहेत का ?
एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही ?”