व्यापाऱ्याला मारहाण करून हातपाय तोडले (फोटो सौजन्य: social media))
छत्रपती संभाजीनगर : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादानंतर चौघांनी मिळून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की, यामध्ये व्यापाऱ्याच्या हाताच्या मनगटाचे व पायाच्या करंगळीचे हाड मोडले आहे. इतकेच नाहीतर त्याच्या मुला-मुलीलाही टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. शनिवारी (दि.9) ही घटना घडली होती. याची तक्रार आता देण्यात आली.
भंगार दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्याला लाकडी बॅट व फरशीने जबर मारहाण केली गेली. मारहाणीत व्यापाऱ्याचे हाताच्या मनगटाचे व पायाच्या करंगळीचे हाड मोडले असून, त्याचा मुलगा व मुलींनाही मारहाण करण्यात आली. ही घटना एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील पावरलूम येथे घडली. अजगर अली अकबर अली (४०), साबेर अली अकर अली (३५), नासेर अली अकबर अली (२८) आणि अकबर अली फेरोज अली (६५, सर्व रा. पावरलूम) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime : सराईत गुंडाने चक्क मैत्रिणीवर केला गोळीबार, रुग्णालयात उपचार सुरु; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
याप्रकरणी अब्दुल अजीज अब्दुल हाफीज (वय ५६, रा. पावरलूम, चिकलठाणा एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर शेजारी राहणाऱ्या अकबर अली फेरोज अली यांचे नातवंडे व इतर मुले नेहमी क्रिकेट खेळत असतात. यामुळे लोकांना त्रास व अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यांनी वारंवार समजावून सांगितले होते. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता, पुन्हा एकदा मुले क्रिकेट खेळत असताना फिर्यादीने त्यांना समजवले.
त्यावेळी अजगर अली, साबेर अली, नासेर अली व अकबर अली हे घटनास्थळी आले. इतरांना त्रास होत नाही, तुलाच का त्रास होतो? असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर अजगर अलीने लाकडी बॅटने फिर्यादीच्या डाव्या पायावर व डोक्यावर मारले, साबेर अलीने डाव्या हाताच्या मनगटावर जबर वार केला. तर नासेर अलीने फरशी फेकून डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारले.
मुलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण
अकबर अली फेरोज अलीने फिर्यादीला धरून ठेवले. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या फिर्यादीच्या मुलगा मोहम्मद अबरार व मुली सायमा बेगम, अलीया फातेमा यांनाही चौघांनी चापट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार पठाण करीत आहेत.