एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघात इतका भीषण की... (संग्रहित फोटो)
चिखली : भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुलडाणाच्या मेहकर फाटा येथे घडली. मृत हे सिंदखेडराजा तालुक्यातील सायळा येथील रहिवासी असून, ते चिखली येथे येत होते. यादरम्यान एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०, रा. सायळा, ता. सिंदखेडराजा) हे दुचाकीवरून (एमएच-२८/बीयू ०५९३) चिखलीकडे येत होते. तेव्हा एसटी बसने जोरदार धडक दिली. सदरचा अपघात एवढा भीषण होता की, गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील असल्याने प्रशासन व स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताच्या घटनेनंतर बसचालकावर निष्काळजीने वाहन चालवने व वेगावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
दरम्यान, अपघातानंतर या मार्गावर वाहतुकीची वाढती कोंडी व निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांकडून मेहकर फाटा परिसरात वेगमर्यादा, वाहतूक पोलिसांची उपस्थिती व अशा निष्काळजीपणे गाडी चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
परभणीत भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. महामार्गावरून वेगाने जात असलेल्या ट्रकने थेट झाडाला धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. यात चालक आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हेदेखील वाचा : Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान