संग्रहित फोटो
पुणे : गुलटेकडी परिसरात राहण्यास असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, दिवंगत साहित्यिक ना. स. इनामदार यांच्या ‘झेप’ बंगल्याची तोडलेली संरक्षित भिंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा बांधून दिली आहे. या प्रकरणात जबरदस्तीने तसेच पुर्वसूचना न देता भिंत पाडून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
याप्रकरणी इनामदार यांचे जावई सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, ४२७/ ७८, टिमवी कॉलनी, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक देवेश जैन, जेसीबी चालकासह कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने ३१ ऑक्टोबर रोजी पूर्वसूचना न देता बंगल्याची संरक्षित भिंत पाडून लोखंडी गेट तोडले होते. तसेच बंगल्याचे नुकसान करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.
यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पुन्हा या सीमाभिंतीचे बांधकाम करुन घेण्यात आले. इनामदार यांच्या मृत्यूपश्चात आरोळे कुटुंब याठिकाणी राहण्यास आहे. बांधकाम व्यावसायिक व आरोळे यांच्यामध्ये खरेदीखत झाले आहे. आरोळे यांनी कागदोपत्री साडेसात कोटी रुपयांना हा बंगला विकला. खरेदीखत झाल्यानंतर ३ महिन्यांत ताबा देण्याचे ठरले. आरोळे यांनी खरेदीखताविषयी आक्षेप घेतले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
हे सुद्धा वाचा : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर
बंगल्याला कादंबरीचे नाव
साहित्यिक ना. स. इनामदार यांनी पेशवाईतील सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जीवनावर आधारित ‘झेप’ ही कादंबरी लिहिली. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीने साहित्य विश्वात अनोखे स्थान निर्माण केले. त्यापाठोपाठ शहेनशाह, मंत्रावेगळा, राऊ अशा त्यांच्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या रसिकांच्या पसंतीस उतरल्या. इनामदार यांचे ६ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले. त्यानंतर, त्यांचे जावई सुभाषचंद्र आरोळे हे त्यांच्या बंगल्यात वास्तव्याला आहेत. पहिल्याच ‘झेप’ कांदबरीने नावलौकिक मिळाल्यामुळे इनामदार यांनी बंगल्याचे नामकरण ‘झेप’ असे केले.






