सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : कोंढव्यात झालेला खून वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला म्हणूनच घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आता बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वारज आंदेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्पुर्वी गोळ्या व कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
अमन शेख (वय २२), अरबाज अहमद पटेल (२४) मयूर वाघमारे (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात गणेश किसन काळे (वय ३०, रा. येवलेवाडी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमीर खान, स्वाराज वाडेकर, अमन शेख, अशा ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत किसन धोंडीबा काळे यांनी तक्रार दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण, पोलिस हवालदार विशाल मेमाणे व त्यांच्या पथकाने केली.
गणेश काळे हा वनराज आंदेकर याच्या खूनातील आरोपी सागर काळे याचा भाऊ आहे. सागर काळे याने वनराज याच्या खुनातील आरोपींना पिस्तूल पुरविले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास खडीमशीन चौकातील भारत पट्रोल पंपाबाहेर गणेश हा रिक्षा घेऊन थांबलेला होता. तेव्हा आरोपी दोन दुचाकीवर तेथे आले. त्यांनी गणेशवर गोळ्या झाडल्या. तर नंतर कोयत्याने डोक्यात सपासप वार करून त्याचा खून केला. खूनानंतर आरोपी एक दुचाकी सोडून तेथून पसार झाले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. तेव्हा पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेतले. चौकशीत कृष्णा आंदेकर, बंडु आंदेकर, आमीर खान, मयुर वाघमारे आणि स्वराज वाडेकर याच्या सांगण्यावरुन खून केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
पिस्तूल कोणी पुरवले
दोन अल्पवयीन मुले तसेच इतर आरोपींकडे दोन पिस्तूल असल्याची माहिती आहे. त्यांनी चार गोळ्या झाडल्या आहेत. हे पिस्तूल त्यांना कोणी पुरवले ? की त्यांना आंदेकर टोळीकडून आधीच पिस्तूले दिली होती ? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, आंदेकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आणल्याची कुजबूज आयुष कोमकरच्या खूनानंतर बोलले जात होते. त्यामुळे पिस्तूल आणखी कोणा-कोणाला पुरवली गेली आहेत असाही प्रश्न आहे.
गँगवारने पुणे दहशतीत
नाना पेठेत आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून, नंतर निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांकडून तरुणावर गोळीबार व एकावर कोयत्याने वार अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पुण्यातील गुंडगिरी आणि टोळीयुद्धाचा विषय ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे शहर दहशतीत आहे.






