ठाण्यात दोघांवर जीवघेणा हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा
Thane Crime News: ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदिरानगर परिसरात 26 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन जणांवर लाठी-काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 9 ते 10 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपींपैकी स्वप्निल शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपशहरप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
फिर्यादी मलया जगबंधु बारीक (38, रा. अंबिकानगर, वागळे स्टेट) हे हॉटेल व्यवसाय करतात.गेल्या वर्षी 2024 मध्ये त्यांचा वर्तकनगर येथे राहणाऱ्या काही जणांसोबत वाद झाला होता. याच वादाचा राग धरून 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मेहुणे मोटारसायकलवरून जात असताना इंदिरानगर येथे टोळक्यांनी त्यांची गाडी अडवून हल्ला केला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
“गणेश लांडगेने फिर्यादी मलया व त्यांच्या मेहुण्यांवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यांना जबर मारहाणही केली. गणेश लांडगेसोबत असलेल्या आणखी ४ ते ५ जणांनीही त्या दोघांवर लाठी-काठीने हल्ला करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत मलया यांना डोके व तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक! भारतातील १०० हून अधिक महिलांची फसवणूक, ‘या’ अॅपमुळे बँकेचे अकाऊंट साफ
मलया जगबंधु बारीक यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गणेश लांडगे, अमर तुशंभर, ओंकार भोसले, अभि पाटील, स्वप्नील शेडगे तसेच इतर ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
“दरम्यान, आरोपी स्वप्नील शेडगे हे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख असून, शहरात बॅनरबाजीच्या कामांमध्ये सक्रिय आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला तडीपारही करण्यात आले होते.”