मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू
मंगलप्रभात लोढा यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी खबरदारी
मुंबई: गिरगावातली प्रसिद्ध हिंदु नववर्ष गुढीपाडव्याची शोभायात्रा विनासायास आणि उत्साहात पार पाडावी याची जोरदार तयारी सुरू असून या अनुषंगाने तिथल्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली. गुढीपाडव्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याने कामाचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातले सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल रोड आणि जगन्नाथ शंकरशेट रोड तसेच खेतवाडी आणि प्रार्थना समाज या भागात जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. गुढी पाडव्याच्या शोभायात्रेच्या या मार्गांवर कामं सुरू असल्याने शोभायात्रेत अडचण येण्याची शक्यता असल्याने मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा घेतला.
कामं सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी आठ वाजे पासून ते १० वाजे पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पाडव्याच्या आधी म्हणजेच १७ मार्च पूर्वी कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करून रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचे आदेश यावेळी मंत्री लोढा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांना तात्काळ हटवण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले.
नवं वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने नियोजित गिरगावची प्रसिद्ध शोभायात्रा सुरळीत पार पडावी या अनुषंगाने व्ही. पी. मार्ग आणि जे. एस. एस. रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामांची आज पाहणी करून आढावा घेतला. रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित… pic.twitter.com/G1XotLMjWZ — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) March 10, 2026
शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण न होता वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही निर्देश मंत्री लोढा यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. गिरगावची गुढीपाडवा शोभायात्रा ही हिंदू नववर्षाच्या स्वागताचा एक भव्य, पारंपरिक आणि उत्साही सोहळा आहे. या यात्रेत ढोल-ताशांचा नाद, महिलांची बाईक रॅली, नऊवारी साडीतील रणरागिणी, आणि ऐतिहासिक विषयांवरील चित्ररथ आकर्षणाचे केंद्र असतात. दरवर्षी गुढीपाडव्याला पहाटेपासूनच गिरगावच्या रस्त्यांवर मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. अशा उत्सवात केवळ रस्त्यांच्या कामामुळे विरजण पडू नये ही आमची भूमिका असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.






