लोणावळा शहरातील भर वस्तीतील एका बंगल्यावर २० ते २२ दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असून पोलिसांना या दरोड्याची खबर लागली नाही. या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. लोणावळ्यातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर 27 मे ला मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोर एका छोट्या टेम्पोत आले होते. मात्र पळून जातांना टेम्पो बंगल्यात सोडून गेले, या टेम्पोत चोरांच्या चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या असल्याचं समोर आलं आहे. या बंगल्यात सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच देखील होता. या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या देखत दरोडेखोर पसार?
या बंगल्याची मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला, वॉचमन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधले. त्यानंतर डॉ. खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली. डॉ हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा आहे. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि चिक्की व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी डॉ हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्याकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळाले, मात्र पुढे दरोडेखोर आणि मागे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र तो असफल होऊन दरोडेखोर चोरीची लूट घेऊन पोलिसांच्या देखत पसार झाले. या पाठलागीचा व्हिडीओ एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
लोणावळा बंदाचा इशारा
या चोरीच्या घटनेने स्थानिक भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून या दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी, अन्यथा लोणावळा बंद करण्यात येईल असा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिला आहे. लोणावळा पोलिसांची चार पथके या दरोडेखोरांच्या मागावर रावण केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.