हळद समारंभातच राडा; हाणामारीत दोघे जखमी, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला अन् अनर्थ टळला (फोटो सौजन्य :pinterest)
कामठी : न्यू कामठी परिसरातील सैलाबनगर येथे शनिवारी (दि. 3) रात्री हळद समारंभातीला वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या तिघांनी गोंधळ घालून शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सैलाबनगर येथील प्रणय बेलेकर यांच्या विवाहनिमित्त आयोजित हळद समारंभात त्यांचे नातेवाईक दुर्गेश पिल्ले आणि त्यांचे कुटुंब सहभागी झाले होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास जेवण करून ते परतत असताना अमित वाठोरे (33), अक्षय वाठोरे (31) आणि शुभम गजभिये (28) हे तिघे मद्यधुंद अवस्थेत समारंभस्थळी आले. त्यांनी दुर्गेश पिल्ले यांच्याशी वाद घातला. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यांनी लाठीने हल्ला करत दुर्गेश पिल्ले यांच्या 6 वर्षीय मुलगा काव्यांश आणि 16 वर्षीय भाची सानिया हिच्यावर हल्ला केला.
यात दोघेही जखमी झाले. त्यांना सुरुवातीला कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त विशाल श्रीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे व सहाय्यक निरीक्षक सचिन यादव घटनास्थळी पोहोचले. दुर्गेश पिल्ले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली.