Crime News Live Updates
गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. असातचं आता निलेश चव्हाणला कोर्टाने ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
31 May 2025 03:59 PM (IST)
रस्त्याने चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर हल्ला करत खून केल्याप्रकरणात तिघांना न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालायने ही शिक्षा दिली असून, या शिक्षेसह प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय राजाभाऊ मुळे (वय 19, रा खालुंब्रे, ता. खेड), अनिकेत अंकुश दुडे (वय 18, रा. सुदवडी, देहु फाटा, ता. मावळ) व अतुल दीपक शिंदे (वय 20, रा कांदेवस्ती, इंदोरी, ता. मावळ) अशी शिक्षा झालेल्यांची नाव आहे. दंडाच्या रकमेपैकी पाच लाख रुपये मृताच्या कुटुंबियांना देण्यात यावेत. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
31 May 2025 01:06 PM (IST)
रस्त्यात दुचाकी आडवी आल्याने दुचाकीस्वाराला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्या कारणावरून दुचाकीवरील दोघांनी एकावर चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी (२६ मे) सकाळी मोहननगर भोसरी येथे घडली. तबरेज वायजुल हक्क अन्सारी (३४, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एमजी २०४२) चालक आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 May 2025 12:47 PM (IST)
पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंदूक दाखवतांना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
31 May 2025 12:44 PM (IST)
जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाची हत्या झाली. या हत्येप्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एक जण फरार आहे. गुरुवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र (सर्व रा. कोडोली, ता. सातारा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे.
31 May 2025 11:46 AM (IST)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज (31 मे) त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.
31 May 2025 11:12 AM (IST)
हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरी बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांच्या किमती मुद्देमालाची चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
31 May 2025 11:11 AM (IST)
अकोल्यातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये दारूच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.