पिंपरीत सायबर क्राईमद्वारे लाखोंची फसवणूक (फोटो- istockphoto)
पिंपरी: गुंतवणुकीच्या बहाण्याने बावधन येथील एका व्यक्तीची 17 लाख 39 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 10 ते 17 मार्च या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली. या प्रकरणी पीडित व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व्यक्ती सोबत टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क केला. न्युझीलँड गोल्ड मर्चंट या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम मिळेल असे अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना काही टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम पाठवण्यात आली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 17 लाख 76 हजार 335 रुपये घेतले. दरम्यान त्यांना काही रक्कम परत करत उर्वरित 17 लाख 39 हजार 400 रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस
शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ४६ वर्षीय व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार व्यावासायिक कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. तेव्हा चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांत त्यांनी वेळोवेळी ४३ लाख ५० हजार रुपये गुंतविले.
मोबाइलवर एक मॅसेज पाठवला अन्…; पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.