HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करताना सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा प्रयत्न (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्य सरकारकडून वाहनांच्या नंबर प्लेटबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमचे वाहन 2019 पूर्वीचे असेल तर ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असेल. ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 असणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नंबर प्लेट बसवली नाही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र याचा गैरफायदा अनेकांनी उठवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील अनेकांची एचएसआरपी नंबर प्लेट बनवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे.
पुणे शहरामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी बनवण्यासाठी वाहनचालकांची घाई सुरु आहे. याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार उचलत असल्याचे दिसत आहे. HSRP नंबर प्लेटसाठी बनवण्यासाठी अर्ज करताना नागरिकांच्या फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट बनवून लोकांकडून पैसे उकळत आहेत. एप्रिल महिन्यानंतर दंडात्मक कारवाईची भीती असल्यामुळे अनेक वाहन चालक हे सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकत आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडे दोन तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करुन अनेकांनी पैसे देखील भरले. मात्र तरी देखील लोकांना HSRP मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीचे गुन्हे होऊ लागल्याने पोलिसांनी लोकांना सावध केले आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवि किरण नाळे यांनी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये न अडकण्याचे आवाहन लोकांना केले आहे.
पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवि किरण नाळे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिकची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्हाला आतापर्यंत दोन तक्रारी मिळाल्या आहेत. एका व्यक्तीचे 1500 रुपये तर दुसऱ्या व्यक्तीचे 4 हजार रुपये बुडाले आहेत. गुन्हेगार वाहतूक विभागाच्या वेबसाईटसारखीच बनावट वेबसाईट बनवतात. त्यामुळे लोकांची फसवणूक होते. लोक इंटरनेटवर वाहतूक विभागाची वेबसाईट शोधतात. त्यावेळी त्यांना बनावट वेबसाईट दिसते. ते त्यावर क्लिक करतात आणि फसले जातात, असे मत त्यांन व्यक्त केले.
लोकांची फसवणूक होऊन त्यांच्याकडून पैसे देखील घेतले जातात असे त्यांनी नमूद केले. एका व्यक्तीने तर सर्चमध्ये दिसलेल्या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक केले. त्याने HSRP साठी लागणारी सर्व माहिती भरली. UPI द्वारे पैसेही भरले. पण त्याला काहीच कन्फर्मेशनचा मेसेज आला नाही आणि त्याचे पैसे बुडाले, अशी माहिती नाळे यांनी दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारच्या निर्णय आणि त्यासाठी दिलेला अल्पवधी यामुळे वाहन चालकांनी घाई केली आहे. यामध्ये वाहन चालकांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरुनच अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. HSRP म्हणजे High-Security Registration Plate. ही नंबर प्लेट खास असते. ती सहज काढता येत नाही. त्यामुळे गाडी चोरीला गेल्यास किंवा इतर गुन्ह्यांमध्ये गाडी वापरली गेल्यास, गाडी शोधायला मदत होते. यामुळे सर्व गाड्यांना ही नंबर प्लेट लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.