महिला वाहतूक पोलिसाला मारहाण (फोटो -सोशल मिडिया)
पिंपरीत महिला पोलिसाला मारहाण
शगून चौकात घडली घटना
महिला पोलिसांनी दिली फिर्याद
पिंपरी: टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो पिंपरी मार्केटमध्ये रस्त्यात लावला. त्याला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याने टेम्पो चालकाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (20 ऑक्टोबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास शगुन चौकाजवळ पिंपरी येथे घडली.
शरद अशोक कांबळे (25, मांजरी खुर्द, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई जयश्री जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयश्री जाधव या पिंपरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. सोमवारी दुपारी त्यांना शगुन चौक पिंपरी येथे वाहतूक नियमन करण्याचे काम देण्यात आले होते. वाहतुकीचे नियमन करत असताना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी शरद कांबळे टेम्पो घेऊन शगुन चौकातून साई चौकाकडे जात होता. त्याने त्याचा टेम्पो खुशी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानासमोर रस्त्यावर थांबवला.
टेम्पो रस्त्यात थांबल्याने वाहतुकीस अडथळा होऊ लागला. त्यामुळे महिला पोलीस जयश्री जाधव यांनी टेम्पोचालकाला टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. त्या कारणावरून त्याने जाधव यांना शिविगाळ करून त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली. पोलिसांनी शरद कांबळे याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
पुण्यात कायद्याचे रक्षकच असुरक्षित? पोलिसांवर हल्ले सुरुच; 2 वर्षातील धक्कादायक आकडा समोर
पुण्यात कायद्याचे रक्षकच असुरक्षित?
भयमुक्त समाज अन् शहर ठेवण्यासाठी दिवस-रात्र तैनात असलेले पोलिसच आज असुरक्षिततेच्या छायेत उभे असून, गेल्या दोन वर्षात शहरात ७५ पोलिसांवर हल्ल्यांची नोंद झाली आहे. रस्त्यावर कायदा राखणाऱ्या व गुन्हेगारांवर उभ्या असलेल्या पोलिसांवरच हात उचलण्याचे प्रकार वाढल्याने पोलिस दलात असंतोष आणि नाराजीचे वातावरण आहे. “पोलिसच सुरक्षित नसतील, तर नागरिक किती सुरक्षित ?” असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे. भयमुक्त समाज अन् शहर ठेवण्यासाठी दिवस-रात्र तैनात असलेले पोलिसच आज असुरक्षिततेच्या छायेत उभे असून, गेल्या दोन वर्षात शहरात ७५ पोलिसांवर हल्ल्यांची नोंद झाली आहे.
गेल्या १५ दिवसात शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. आपले कर्तव्य संपवून मध्यरात्री घरी निघालेल्या पोलिसांवर हे हल्ले झाले आहेत. तत्कालीक कारण असले तरी पोलिसांवर हात उचलणे म्हणजे आता सहजतेचे वाटू लागले आहे. नागरिक भिडभाड न बाळगता तसेच आदरयुक्त भिती न बाळगता पोलिसांवरच हात उचलू लागले आहेत. त्यामुळेच पोलिसांचा दरारा संपला का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.