Photo Credit- Team Navrashtra
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे पुण्यात वातावरण चांगलंच तापलं होतं. या घटनेनंतर शहरात पुणे भाजप महिला आघाडीकडून डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या रुग्णालयात जोरदार तोडफोड केली. आता या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या गैरवर्तणुकीमुळे महिलेला जीव गमवावा लागला, असा ठपका ठेवण्यात आला. यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राज्य शासनाने आरोग्य विभागाला अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला. शुक्रवारी युद्धपातळीवर चौकशी करून समितीने निष्कर्ष काढला की, संबंधित गर्भवती महिलेला तातडीने रुग्णालयात भरती करून उपचार देणे आवश्यक होते. मात्र, रुग्णालयाने तसे न करता भरतीस नकार दिला, त्यामुळे महिलेला प्राण गमावावे लागले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
Dinanath Mangeshkar Hospital : रुग्णालयाने पाच तास उपचार दिले नाहीत…; रुपाली चाकणकरांचा पारा चढला
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्राथमिक निष्कर्षानंतर आता सविस्तर चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती नेमली असून, यासंदर्भात गंभीर आरोप समोर आले आहेत. तनिषा भिसे या २८ मार्च रोजी उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना दाखवले होते.
डॉ. घैसास यांनी ही प्रसूती जोखमीची असल्याने तनिषाला तातडीने भरती होण्याचा सल्ला दिला. मात्र, भरतीसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, अशी अट घालण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी २ ते ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने तनिषाला भरती करून घेतले नाही, असा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून कऱण्यात आला.
मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत वाद
यानंतर तनिषाला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील गर्दी पाहून कुटुंबीयांनी वाकड येथील सूर्या मदर अॅण्ड चाइल्ड रुग्णालयात तिची भरती केली. तिथे तनिषाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणानंतर आरोग्य विभागाने तातडीने चौकशी समिती नेमून प्राथमिक अहवाल सादर केला आहे. अहवालात रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आला आहे. लवकरच सविस्तर अहवालही शासनाकडे सादर केला जाणार आहे.