अॅनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेत नागपुरात डॉक्टरची आत्महत्या; रात्री ड्युटी केली अन् सकाळी जीवन संपवलं (File Photo : Suicide)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांचा विषय चर्चेचा मुद्दा बनत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मानसिक तणावात असतात. त्यांच्यावर कामाचा ताण असतो. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशकांची नियुक्ती केली गेली. मात्र, डॉक्टर म्हणून सेवेत असलेल्या एका तरूण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, ‘अॅनेस्थेशिया’ औषधाचा ओव्हरडोस इंजेक्शनद्वारे घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा वैद्यकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. उपराजधानीतील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम नजीकच्या न्युरॉन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ही घटना घडली. डॉ. ईश्वर चांदेवार (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. सेवाभावी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर येथे तर्कवितर्क सुरू झाले. मानेवाडा परिसरात डॉ. ईश्वर चांदेवार यांचे घर आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धंतोली पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या न्युरॉन रुग्णालयात प्रशासकीय विभागातही सेवा देत होते.
दरम्यान, काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती मिळाली. डॉ. ईश्वर यांचे वडील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा एक भाऊ नागपूर जिल्हा परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. प्रेम विवाह केलेल्या डॉ. ईश्वर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असून, या घटनेमागे कुटुंबातील वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निपचित पडून होते
रविवारी रात्री सेवा दिल्यानंतर ते सोमवारी सकाळी आपल्या कक्षात पोहोचले. त्यांनी आपल्या हाताने ‘अॅनेस्थेशिया’चे इंजेक्शन टोचून घेतले. औषधाची मात्रा अतिरिक्त झाल्याने कक्षातून बाहेर आले नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने दार उघडले असता ते बेशुद्धावस्थेत निपचित पडले होते. नंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. त्यानंतर या आत्महत्येमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे.
ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या
चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती.






