Pune Voter List SIR Drive: पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची नावे गायब होणार! २४ ऑगस्टला नवी प्रारूप यादी होणार प्रसिद्ध
Pune Voter List SIR Drive: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे ११ लाख मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, आतापर्यंत ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत.
या कामासाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, त्यांनी भरून घेतलेले अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत. आतापर्यंत ६२ लाख ३६ हजार ६७१ अर्जाची पडताळणी पूर्ण होऊन ते अपलोड करण्यात आले आहेत. दरम्यान, सुमारे १५ लाख गणना अर्ज अद्याप बीएलओकडे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मृत, दुबार आणि अनुपस्थित मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेषतः सुमारे ११ लाख अनुपस्थित मतदारांच्या तीन वेळा पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आयोगाच्या निर्देशानुसार त्यांची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेस १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप पडताळणी न झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून संबंधित बीएलओची माहिती मिळवून तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मीनल कळसकर यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नियमानुसार नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. मात्र, गणना अर्ज वेळेत भरून देणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख मृत मतदार आढळले आहेत. तसेच अनुपस्थित आणि अपूर्ण अजर्जामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारसंख्या किमान १२ ते १३ लाखांनी घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






