तोतया डॉक्टरने थाटलं स्वतःच क्लिनिक, चुकीची औषधी देऊन रुग्णांची फसवणूक (फोटो सौजन्य-X)
आश्वी प्रतिनिधी : ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली ग्रामीण भागामध्ये फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात देखील असंच एक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक तोतया डॉक्टर विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करत अनेक रुग्णांना बरे केल्याचे पासून फसवणूक करत असल्याचे समोर आले होते. परंतु काही रुग्णांच्या सावधगिरीने या तोतया डॉक्टरचे पितळ उघडे पडले. या तोतया आयुर्वेदिक डॉक्टरवर आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत संबंधित होतया डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपण उपचार घेत असलेला डॉक्टर हा तोतया असून त्याकडे आयुर्वेदाचे कुठलेही पदवी तसेच वैद्यकीय बोर्डाचे प्रमाणपत्र नसल्याचे समजतात परिसरातील रुग्णांना मोठा धक्का बसला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. तय्यब बाबुबाई तांबोळी व उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉ.शहनाज शेख यांच्या सतर्कतेमुळे आश्वी बु (ता संगमनेर) येथील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार अधिनियम कलम ३३ व ३६ तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ.तय्यब तांबोळी यांनी दिलेल्या फिर्य़ादमध्ये नमुद केली की, आश्वी बु (ता. संगमनेर) येथील संगमनेर शेतकी गट ऑफिस मध्ये नाव नसलेल्या व्हायल मधून इंजेक्सन देत असुन तेथे मोठी गर्दी झाली आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर आश्वी बु येथील उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉ शहनाज शेख यांना सदर घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पाठवले असता उपलब्ध माहितीनुसार आश्वी बु (ता संगमनेर) येथील संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिस च्या पाठीमागील रूम मध्ये इम्रान अब्दुल खान (राहणार ८२, मंसेपुर मार्ग, रोसियाका, तहसिल कामा, रोसियाका, मुसेपुर, भरतपुर, राजस्थान) हा डॉक्टरकीची कोणती ही पदवी तसेच व्यवसाय परवाना नसताना गेल्या काही रविवार पासुन गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेवात, मणक्यातील गॅप, पॅरेलेसीस, मानेपासून ते तळ पायापर्यत नस दबणे आदी आजारावर गोळ्या औषधे न देता आयुर्वेदिक इंजेक्शनच्या नावाखाली अनधिकृतपणे उपचार करत होता. तोतया डॉक्टर हा नाव नसलेल्या व्हायलमधून इंजेक्सन देत होता.
घटनास्थळी १८ नाव नसलेल्या व्हायरल, ३ एम एल च्या प्रत्येकी २८ सीरींज तसेच डॉ. हुसेन नाव असलेले व्हिजीटिगं कार्ड सापडले. येथील कर्मचारी भरत मधुकर वर्पे (राहणार कनोली, ता.संगमनेर) याच्या सहाय्याने हा तोतया डॉक्टर वैद्यकिय व्यवसाय चालवत होता असे उघड झाले.
तोताया डॉक्टरकडे कोल्हार (ता राहाता) तसेच संगमनेर तालुक्यातील आश्वी बु, औरंगपुर, लोहारे कसारे, ओझर, मनोली आदी गावातील अनेक रूग्ण येत असत. प्रत्येक रूग्णाकडुन ११०० रूपये प्रमाणे इंजेक्शन तसेच मालीशसाठी तेल सदर तोतया डॉक्टर देत. तसेच दि १६ मार्च रोजी या तोतया डॉक्टरने जवळपास १८ रूग्णावर उपचार केले असल्याचे समजते.
इम्रान अब्दुल खान राहणार भरतपुर राजस्थान तसेच त्याला मदत करणारा भरत मधुकर वर्पे (राहणार कनोली ता.संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांचे विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार अधिनियम कलम ३३ व ३६ तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सेबल पी. डी. सोनवणे करत आहे.
वैद्यकिय क्षेत्रातील कुठले ही पदवी नसलेला व्यक्ती संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिसमध्ये वैद्यकिय व्यवसाय कसा करू शकतो असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामागे कोणत्या कर्मचाऱ्याचा हात आहे तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यकीची मागे काही राजकीय वरदहस्त आहे का? या सारखे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उत्पन झाले आहे.