अवैद्य सावकारी केल्याप्रकरणी वैद्य सावकारावर रबाळेत गुन्हा दाखल
नवी मुंबई: घणसोलीतील एका सावकारावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, शासकीय नियमानुसार एक टक्का दराने व्याज घ्यायची परवानगी असताना देखील दहा टक्के दराने व्याज घेतल्याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून भाऊसाहेब सावंत या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोलीतील सावकार भाऊसाहेब सावंत हे परवानाधारक सावकार आहेत. सावंत यांच्या जवळून एका महिलेने दीड वर्षांपूर्वी 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. सावंत यांनी शासकीय नियमानुसार मासिक एक टक्का दराने व्याज घेणे अपेक्षित होते. मात्र सावंत यांनी महिलेच्या गरजेचा गैरफायदा घेऊन तिच्या जवळून दरमहा दहा टक्के व्याज वसूल करायला सुरुवात केली. महिलेने गेले दीड वर्ष सावंत यांना ऑनलाईन तसेच रोख पद्धतीने 70 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊनही सावंत यांची व्याज वसुली सुरूच होती. यासाठी सावंत यांच्या पत्नीने सदर महिलेला अश्लील शब्दांत शिवीगाळ देखील केली. तसेच सावंत यांचे वसुली एजंट यांनी महिलेच्या घरी जाऊन त्यांची सहा वर्षांची लहान मुलगी घरात एकटी असताना, तिला दमदाटी केली . सावकारकीच्या या त्रासाला कंटाळून महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच याबाबत कारवाईसाठी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी उपनिबंध सहकारी संस्थेत पत्रव्यवहार केला होता.
उपनिबंध कार्यालयाच्या वाजेरे यांनी पंचांसह सावकार सावंत यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता, त्या ठिकाणी एकूण 66 कर्जदारांकडून कोऱ्या स्टॅम्पपेपर वर सह्या घेऊन त्यांचे कोऱ्या चेकवर देखील सय्या घेतल्याचे आढळून आले. अजुन इतर कर्जदारांचे मोजमाप सुरू आहे. या सर्व बाबी बेकायदेशीर व सावकारी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने, सावकार भाऊ सावंत व त्यांचे सहकारी यांच्या विरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.