पुण्यात मोठी रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचा जावई पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्याच्या खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. पोलिसांनी ही पार्टी उधळून लावली.
पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारीची कारवाई केली. पहाटे तीनच्या सुमारास पार्टीला सुरुवात झाल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत या ठिकाणी दारू, हुक्का, अंमली पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतले. त्यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे.
खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली. या रेव्ह पार्टीत आणखी तीन महिला देखील होत्या, त्या छाप्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या होत्या. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : एकट्या जाणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून सामूहिक लैंगिक अत्याचार; लोणावळ्यामधील धक्कादायक प्रकार
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅम्पवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली होती. भाजपचे आमदारही या वादात खडसेंवर तुटून पडले होते. त्यातच मध्यरात्री सुरु झालेल्या रेव्ह पार्टीत खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याचा समावेश असल्याचे समोर आले. त्यामुळे खडसेंच्या विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे.