पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल
Pune News: पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन ढोल-ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यातही दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. त्याच ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या २० वर्षीय महिला पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्याला पथकातील सदस्यांकडून अडथळा आणण्यात आला आणि त्यानंतर विनयभंगाची घटना घडली.
Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
दरम्यान, त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. याच वेळी पथकातील एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक पत्रकाराच्या पायावरून फिरवले. याचा जाब विचारण्यासाठी त्या गेल्या असता, त्याच सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिल्याचा आरोप आहे. महिला पत्रकाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या सहकाऱ्याने या प्रकाराबाबत जाब विचारला असता, पथकातील सदस्याने त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केली.
यानंतर महिला पत्रकाराने थेट पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन ढोलताशा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला असून, महिला पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करताना छायाचित्रकारांना ताल ढोल-ताशा पथकातील वादकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढण्यास मनाई करून त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यास भाग पाडण्यात आले.दरम्यान, बेलबाग चौकात टिळक पुतळ्याकडून येणारे जिलब्या मारुती मंडळ मिरवणुकीसाठी मार्गस्थ होत असताना शिवाजी रस्त्याचे मुठेश्वर मंडळ पुढे आले. या वेळी दोन्ही मंडळांच्या ढोल-ताशा पथकातील सदस्यांत पुढे जाण्यावरून हाणामारी झाली. मात्र, मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.