तापमानातल्या चढ उताराचे कारण स्पष्ट (फोटो- istockphoto)
तापमानातल्या चढ उताराचे कारण स्पष्ट
हवामान बदलावर पश्चिमी विक्षोभ आणि आर्द्र वाऱ्यांचा प्रभाव
हिवाळ्यात उत्तर गोलार्धावर सूर्यकिरणे कमी तीव्रतेने पडतात
सुनयना सोनवणे/पुणे: तापमानात चढ-उतार होणे ही नैसर्गिक बाब असून ते प्रामुख्याने ऋतुचक्र आणि वाऱ्यांच्या दिशेवर अवलंबून असते. यंदाचा डिसेंबर महिना मात्र तुलनेने वेगळा ठरला. पुणे शहरात अलीकडे तापमानात होत असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. एस. डी. सानप यांनी सविस्तर माहिती देत हवामानातील या बदलामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली.
डॉ. सानप यांच्या मते, या काळात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हिवाळ्यात उत्तर गोलार्धावर सूर्यकिरणे कमी तीव्रतेने पडतात, त्यामुळे तापमान घटते. या कोरड्या वाऱ्यांमुळे थंडी वाढून सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. परिणामी पुण्यात मागील महिन्यात सरासरी तापमान सुमारे १० अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. मात्र जानेवारी महिन्यात परिस्थितीत बदल झाला. “पश्चिमी विक्षोभ” सक्रिय झाल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव झाला. यामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्याचवेळी मुख्यतः बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांत वाढ झाली. परिणामी वातावरणातील आर्द्रता वाढून काही काळ ढगाळ वातावरण निर्माण झाले.
ढगाळ वातावरण थंडी वाढण्यासाठी अनुकूल नसते. ढग सूर्यकिरणांना अडवतात, त्यामुळे दिवसा तापमान काही प्रमाणात कमी राहते; परंतु जमीन लवकर थंड होत नसल्याने रात्रीचे तापमान तुलनेने वाढते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी जाणवते.
याउलट, आकाश निरभ्र असताना आणि उत्तरेकडून कोरडे वारे वाहत असताना थंडी अधिक असते.
परंतु आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास थंडी कमी होते आणि किमान तापमान वाढते. जानेवारी महिन्याच्या बहुतांश काळात अशीच स्थिती पाहायला मिळाल्याने पुणेकरांना अपेक्षेपेक्षा सौम्य थंडीचा अनुभव आला. हवामानातील हे बदल ऋतुचक्राचा भाग असले तरी पश्चिमी विक्षोभ, वाऱ्यांची दिशा आणि वाढलेली आर्द्रता यांचा स्थानिक हवामानावर मोठा प्रभाव पडत असल्याचे डॉ. सानप यांनी नमूद केले.
Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…
पुण्यात पहाटेच्या वेळी वाढतोय गारठा
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पहाटेच्या वेळी गारठा वाढला आहे. दिवसभर निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, ‘सध्या पुणे आणि परिसरातील हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण कमालीचे घटले आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गारवा अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच दिवसभर आकाश पूर्णपणे निरभ्र राहत असल्याने सूर्याची उष्णता रात्री वेगाने उत्सर्जित होते आणि पहाटेच्या किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळते. यामुळेच यंदा डिसेंबरमध्ये गेल्या दशकातील सर्वाधिक एक अंकी तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत.






