सौजन्य - नवराष्ट्र टीम
मेढा : महाबळेश्वरमधील बस स्थानक परिसरात वनविभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. वन्यप्राणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत ५.९८० किलो इतके खवले जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
महाबळेश्वर वनविभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिमंडळ अधिकारी सुनिल लांडगे यांनी आपल्या पथकासोबत महाबळेश्वर येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून, वन्यप्राणी खवले मांजराची शिकार करून त्याचे खवले काढून चिपळूण वरून बसने प्रवास करून महाबळेश्वर या ठिकाणो विक्रीच्या उद्देश्याने आलेला आरोपी प्रसाद तुकाराम गोसावी (रा. मानपाडा डोंबिवली याला मुद्देमालासह पकडले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये प्र.गु.रि.क्र. ०४/२०२६ वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीकडून खवले मांजराचे ५.९८० किलो इतके खवले जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत खवले मांजर या वन्यप्राण्याचा अनुसूची मध्ये समावेश आहे, व सदर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ३ ते ७ वर्षापर्यंत शिक्षा किंवा २५ हजार रुपये इतका दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सदरचा गुन्हा आरोपीने मान्य व कबूल आहे.
ही कारवाई प्रदीप रॉधळ, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, दिगंबर जाधव सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा,महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सुनील लांडगे (वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर), वनरक्षक बा.भ.मराडे, तुकाराम निकम, वनरक्षक तळदेव, कायम वनमजूर संतोष काळे, रोजंदारी मजूर विशाल जाधव, समीर उतेकर, गणेश वागदरे यांनी केली आहे. पुढील तपास सुनील लांडगे करीत आहेत.
अवैध शिकार करणे किंवा वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करणे, अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास ३ ते ७ वर्षापर्यंत शिक्षा किंवा २५ हजार रुपये इतका दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी केले आहे.






