File Photo : Crime
पुणे शहरातील हडपसर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी रागात एका बँक मॅनेजरची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हेदेखील वाचा- इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना
वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय 47) असे हत्या झालेल्या बँक मानेजरचं नाव आहे. वासुदेव कुलकर्णी हे हडपसर परिसरातील उत्कर्षनगर येथील रहिवासी आहेत. तर मयूर भोसले (वय 20) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो हडपसर परिसरातील वेताळबाबा वसाहत येथील रहिवासी आहे. रात्री जेवण झाल्यानंतर वासुदेव कुलकर्णी बाहेर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी परिसरात बसलेल्या चौघांनी त्यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉट मागितला. मात्र वासुदेव कुलकर्णी यांनी त्या चौघांना नकार दिला आणि पुढे निघून गेले. यावेळी चौघांनी वासुदेव कुलकर्णी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने त्यांनी वासुदेव कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वासुदेव कुलकर्णी गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा- कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यांनी वासुदेव कुलकर्णी यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुलकर्णी यांचे भाऊ विनायक (वय ५२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघांचा शोध सुरु आहे. मयूर भोसले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हडपसर येथील उत्कर्षनगर येथे एका सदनिकेत राहतात. ते शनिवार पेठ येथील एका खासगी बँकेत मॅनेजर आहेत. रात्री 10.30 च्या सुमारास कुलकर्णी फिरण्यासाठी बाहेर पडले. उत्कर्षनगर परिसरातील पदपथावरुन जात असताना तेथील काही मुलांनी कुलकर्णी यांच्याकडे मोबाइल हॉटस्पॉट मागितला. मात्र, कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींना कुलकर्णी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्यावर हल्ला केला. कुलकर्णी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आरोपी हडपसर येथील बंटर स्कूल परिसरातील वसाहतीत राहत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.