हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक (File Photo : Fraud)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. असे असताना नागपुरात एकाच भूखंडाची तिघांना विक्री केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, एकालाही भूखंड दिला नाही. फसवणुकीची ही घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
हेदेखील वाचा : Pune Crime News: बँक व्यवस्थापकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य; विरोध करताच केले असे काही…
याप्रकरणी पोलिसांनी आसीम नावेद मोहम्मद इसरारउल्लाह (वय 54, रा. आरएमएस कॉलनी, अनंतनगर, गिट्टीखदान) यांच्या तक्रारीवरून आर. मोर्स डेव्हल्पर्सच्या संचालकांवर गुन्हा नोंदविला आहे. आनंद नारायण खोब्रागडे आणि शारदा आनंद खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. आसीम यांचा पोकलेन आणि जेसीबी मशीन्स विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी खोब्रागडे दाम्पत्य मे. आर. मोर्स डेव्हलपर्स प्रा. लि.चे संचालक असून, नवा नकाशा येथे त्यांचे कार्यालय आहे.
जागेसाठी एक कोटीचा केला व्यवहार
आरोपी आनंद आणि आसीम एकाच शाळेतून शिकल्यामुळे त्यांच्यात जुनी ओळख होती. ऑक्टोबर 2022 मध्ये आनंद याने आसीमला फोन करून कामठीच्या रनाळा भागात नवीन लेआऊट टाकत असल्याची माहिती दिली. आसीम यांनी त्याच्या लेआऊटमध्ये भूखंड खरेदीची इच्छा व्यक्त करून 116 क्रमांकाच्या भूखंडाचा 1 कोटी रुपयात व्यवहार केला.
पैसे घेतले अन् रजिस्ट्रेशन मात्र नाहीच
करारनामा झाल्यानंतर त्यांनी आरोपींना पूर्ण पैसेही दिले. मात्र, आरोपींनी अनेक महिने लोटल्यानंतरही रजिस्ट्री करून दिली नाही. तसेच भूखंडाचा ताबा देण्यासही टाळाटाळ करू लागले. आसीम यांनी विचारपूस केली असता एनआयटी आणि एनएमआरडीएकडून रिलीज लेटर आले नसल्याची बतावणी केली. त्यानंतर रिलिज लेटरचे काम करण्यासाठी आणखी 20 लाख रुपये घेतले. त्यालाही अनेक महिने लोटले.
पुन्हा 1 कोटीची केली मागणी
दरम्यान, आसीम यांनी भूखंडाच्या मार्किंगसाठी मजूर पाठवले असता त्यांना शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली आणि आसीम यांना पुन्हा 1 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर विक्रीपत्र करून देणार नाही, असे सांगितले. शेवटी कंटाळून आसीम यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांना धमकावले. पुन्हा भूखंडावर पाय ठेवल्यास तेथेच पुरण्याची धमकी दिली.
पैसे घेतले, ताबा दिला नाही
आसीम यांनी माहिती काढली असता आरोपींनी त्यांचाच भूखंड मेसर्स विरानी अँड कंपनी फायनंशीअर सर्व्हिसेसचे संदीप विरानी यांना दाखवून 1 कोटी 30 लाख 50 हजार रुपये घेतले आणि त्यांनाही विक्रीपत्र करून न देता फसवणूक केल्याची माहिती मिळाली. तसेच 118 क्रमांकाच्या भूखंडाचा विरेंद्रसिंग शेखावत यांच्याशी सौदा करून 1 कोटी 20 लाख घेतले आणि त्यांनाही भूखंडाचा ताबा दिला नव्हता.
एकाच जागेसाठी तिघांची फसवणूक
तिन्ही पीडितांनी खोब्रागडे दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक, धमकावणे आणि खंडणी मागण्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ