धक्कादायक ! व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...
नागपूर : खासगी कंपनीच्या संचालकाचे व्हॉट्सअॅप खाते हॅक करून त्यांच्या नावाने बनावट संदेश पाठवत सायबर गुन्हेगारांनी कंपनीची ९८.५० लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मानेवाडा येथील रहिवासी अभिजित मोरे (वय ३२) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित मोरे हे बुटीबोरी येथील सालासर अलॉय इंडस्ट्रीज प्रा. लि. मध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. कंपनीचे संचालक राधेश्याम मालू हे कुटुंबासह जपान दौऱ्यावर गेले होते. तक्रारीनुसार, 20 जूनला मोरे यांना मालू यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला. त्यामध्ये त्या महिन्यात कोणते देयक प्रलंबित आहे का, अशी विचारणा केली होती. मेसेज संचालकांकडूनच आला असल्याचा समज करून मोरे यांनी युनिटी बँकेला ९० लाख रुपये देय असल्याचे उत्तर दिले.
दरम्यान, रक्कम मोठी असल्याने मोरे यांनी मालू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज त्यांना प्राप्त झाला. संचालकांच्या क्रमांकावरून सातत्याने संदेश येत असल्याने आणि व्हॉट्सअॅप प्रोफाइलही योग्य दिसत असल्याने मोरे यांना संशय आला नाही. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला बँकेत पाठवून पूर्वस्वाक्षरीत धनादेशाद्वारे चिंतामणी प्रोजेक्ट लिमिटेडच्या खात्यात ९८.५० लाख रुपये जमा केले.
माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तपास
राधेश्याम मालू यांनी व्हॉट्सअॅपद्वारे मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम वळती झाल्याचा संदेश बँकेकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मोरे यांना दूरध्वनीवर संपर्क केला. त्यावेळी मोरे यांनी त्यांच्या सूचनेनुसारच रक्कम हस्तांतरित केल्याचे सांगितले आणि फसवणूक उघडकीस आली. सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्यानंतर २३ जूनला त्याच क्रमांकावरून कंपनीच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मागवली.
रक्कम तातडीने पाठवण्याच्या सूचना
मोरे यांनी खात्याचा तपशील पाठवल्यानंतर संबंधित त्वरित रक्कम पाठवण्याचा आग्रह व्यक्तीने मुंबईस्थित चिंतामणी प्रोजेक्ट लिमिटेडच्या एचडीएफसी बँक खात्यात तातडीने ९८.५० लाख रुपये हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या.






