अकोला: डिजिटल युगात डेटिंग अॅप्सचा वापर झपाट्याने वाढत असतानाच, त्याचा गैरवापर करत फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांना निमंत्रण मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव अकोल्यातील एका घटनेतून समोर आले आहे. ‘गे डेटिंग’ अॅपवरून ओळख झालेल्या एका बँक अधिकाऱ्याला सापळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून आरोपींनी ब्लॅकमेल करत तब्बल ८० हजार रुपयांची उकळणी केली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.
Froud News : पुण्यातील तांबे व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल 48 लाखांना गंडवले
नेमकं काय घडलं?
अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याची एका अनोळखी व्यक्तीशी समलैंगिक डेटिंग अॅपवरून ओळख झाली. सुरुवातीच्या संवादानंतर मैत्री झाली आणि दोघांनी १४ जून रोजी प्रत्यक्ष भेटण्याचे ठरवले. आरोपी मनीष नाईक याने हिंगणा फाट्यावर पीडित अधिकाऱ्याची भेट घेतली आणि त्याला शहरातील नदीकिनाऱ्यावर नेले. तिथे दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाले.
हे संबंध होत असतानाच मनीष नाईकने त्याचे इतर तीन साथीदार घटनास्थळी बोलावले. त्यानंतर चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. नंतर त्याच व्हिडीओच्या आधारे पीडित अधिकाऱ्याला धमकावण्यात आले. “हा व्हिडीओ व्हायरल करू” अशी भीती दाखवत सुरुवातीला ३० हजार रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण ७९,३०० रुपये आरोपींनी बँक अधिकाऱ्याकडून वसूल केले. या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
योजना आखली
पोलिसांकडे आरोपींचे केवळ मोबाईल क्रमांक होते. पुरावे कमी असल्यामुळे पोलिसांनी हुशारीने योजना आखली. पीडित अधिकाऱ्याच्या मदतीने पुन्हा एकदा आरोपींना भेटण्याचा बहाणा करून ठिकाण ठरवले. त्या वेळी आरोपी मनीष नाईक प्रत्यक्ष स्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मयूर बागडे या दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.
इंजेक्शनद्वारे शारीरिक नियंत्रण?
पोलिस तपासात अजून एक गंभीर बाब समोर आली आहे. आरोपी मनीष नाईक याच्याकडे काही प्रकारचे उत्तेजक इंजेक्शन्स आढळले. या इंजेक्शनच्या प्रभावाने शारीरिक संबंध सहज साधले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर आणि चिंताजनक बनते.
उर्वरित आरोपी
सध्या दोघे आरोपी पोलिस कोठडीत असून, उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, याच पद्धतीने इतर समलैंगिक व्यक्तींनाही जाळ्यात ओढून फसवले गेले आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीच्या इतर गुन्ह्यांचीही शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांचं आवाहन
खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडलेल्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा. तुमचं संरक्षण हे आमचं कर्तव्य आहे.”