गोवा : बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एक निर्दयी आईने आपल्याच 4 वर्षाच्या चिमुरड्याला जीवे मारल्याचा घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये (Bangalore) सीईओ पदावर कार्यरत असणारी ही महिला गोव्यामध्ये (Goa Crime Case) फिरायला गेली आणि तिथेच असणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या (Murder Case) केल्याचा आरोप पोलिसांनी (Goa Police) महिलेवर केला असून तिला अटक करण्यात आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, या आरोपी महिलेचे नाव सूचना सेठ असे असून ती नॉर्थ गोव्यातील सोल बनयान ग्रांदे या हॉटेलमध्ये वास्वव्यास होती. तिच्या सोबत तिचा 4 वर्षाचा मुलगा देखील आला होता. मात्र चेक आऊट करताना मुलगा तिच्यासोबत नव्हता. तसेच तिने गोवा ते बंगलुरु प्रवास करण्यासाठी टॅक्सीचा वापर केला. तिने चेक आऊट केल्यानंतर हॉटेल स्टाफ तिची रुम साफ करायला गेले असता तिच्या खोलीमध्ये सर्वत्र रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. याबाबत हॉटेल मालकाने पोलिसांनी माहिती दिल्यानंतर आरोपी महिलेला फिल्मी स्टाईलमध्ये अटक करण्यात आली.
आरोपी महिला सूचना सेठ हिने हॉटेल स्टाफला तिच्यासाठी गोव्याहून बंगळुरूपर्यंत थेट टॅक्सी बुक करायला सांगितली. हा प्रवास विमानाने सोप्पा होईल असे सांगून देखील तिने टॅक्सी बघायला सांगितली. यानंतर ती टॅक्सीने हॉ़टेलमधून निघून गेली. आरोपीने चेक आऊट केल्यानंतर साफसफाईवेळी हॉटेल स्टाफला रुममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचे डाग दिसून आले. याबाबत पोलिसांना ताबडतोब माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले असता हॉटेलची रुम सोडताना तिच्यासोबत तिचा मुलगा नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हर फोन केला, आणि सूचना सेठ यांच्याकडे फोन देण्यास सांगितलं. त्यांनी सेठ यांना मुलाबाबत प्रश्न विचारले असता, आपण मुलाला एका मित्राच्या घरी सोडल्याचं सेठ म्हणाल्या. त्यांनी त्या मित्राचा पत्ताही पोलिसांना फोनवर सांगितला.
मात्र पोलिसांनी त्या जागेचा शोध घेतल्यानंतर तो पत्ता खोटा असल्याचे समोर आले. पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सी ड्रायव्हारला कॉल करत कोंकणी भाषेत बोलून, सेठ यांना कळणार नाही अशा प्रकारे टॅक्सी ड्रायव्हरला गाडी जवळच्या एखाद्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली. तोपर्यंत टॅक्सी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात पोहोचली होती.
टॅक्सी चालकाने हुशारी दाखवत ऐमंगला पोलीस ठाण्यामध्ये थेट गाडी घेतली. गोवा पोलिसांनी आधीपासूनच फोन करून स्थानिक पोलिसांना घडलेली घटना सांगितली. त्यामुळे टॅक्सी पोलीस स्थानकाच्या आवारात येताच पोलिसांनी सेठ यांना ताब्यात घेऊन गाडी तपासण्यास सुरुवात केली. यावेळी सेठ यांच्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर गोवा पोलिसांचं एक पथक थेट सूचना सेठला अटक करण्यासाठी रवाना झालं. यापुढे गोवा पोलीस 4 वर्षाच्या मुलाचा आईने केलेल्या खूनाचा सखोल तपास करणार आहेत.