nagpur (फोटो सौजन्य: pinterest )
नागपूर शहरातील महाल परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या सहावी ते आठवी इयत्तेतील मुलींच्या पालकांना व्हॉट्सअॅपवरून आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट शिक्षिकेच्या नावाने शैक्षणिक कामाच्या बहाण्याने मुलींचे आधी पासपोर्ट फोटो आणि नंतर अर्धनग्न फोटो मागितल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरात चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्री 5 घरे फोडली; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला
शैक्षणिक कामाची बतावणी
या प्रकरणात आरोपीने शाळेतील शिक्षिका असल्याचे भासवून व्हॉट्सअॅपवरून पालकांशी संपर्क केला. सुरुवातीला म्हणे शैक्षणिक कामासाठी पासपोर्ट साईझ फोटो पाठवण्याची विनंती करण्यात आली. काही पालकांनी खातरजमा न करता हे फोटो पाठवले.
शासकीय योजनेसाठी विकृत मागणी
थोड्याच वेळात त्याच क्रमांकावरून आलेल्या पुढील संदेशाने पालक हादरून गेले. यात सांगण्यात आले की, एका शासकीय योजनेसाठी मुलींचे अर्धनग्न फोटो आवश्यक आहेत. या विकृत मागणीने पालकांना शंका आली आणि त्यांनी शाळेच्या प्रशासनाशी थेट संपर्क साधला. चौकशीत हे लक्षात आले की शाळेच्या वतीने कोणतीही अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही.
१५ ते १६ पालक ठरले फसवणुकीचे बळी
प्राथमिक तपासात १५ ते १६ मुलींच्या पालकांनी या बनावट क्रमांकावर फोटो पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालकांनी तात्काळ याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर कायद्यासह भारतीय दंड संहितेतील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू केला असून सायबर तज्ज्ञांच्या सहाय्याने मेसेजेसचा स्रोत शोधला जात आहे.या प्रकारामुळे संपूर्ण नागपूर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला शोधून कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. पालकांनी अधिक सजग आणि दक्ष राहणे हीच अशा घटनांपासून संरक्षणाची पहिली पायरी आहे.
Ichalkaranji Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल