हॉटेल 'टू बीएचके'ला दणका; मद्यविक्रीचा परवानाच केला रद्द
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल ‘टू बीएचके’ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने दणका दिला. हॉटेल ‘टू बीएचके’वर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. राजा बहादुर मिल परिसरातील या हॉटेलचा एफएल-3 प्रकारचा मद्यविक्री परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कलम ५४ (१) (क) अन्वये ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग, सी विभाग, पुणे येथील निरीक्षकांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी अचानक तपासणी केली असता गंभीर नियमभंग आढळून आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ड्राय डे असतानाही मध्यरात्रीनंतरही अनुज्ञप्ती उघडी ठेवून मद्यविक्री व सेवा दिल्याचे निदर्शनास आले. तसेच एफएलआर-३ ए नोंदवही ३ जुलै २०२५ नंतर तब्बल ४१ दिवस अद्ययावत करण्यात आलेली नव्हती. मंजूर नकाशात बदल करून काऊंटर उघडणे व अंतर्गत रचनेत बदल केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
या नियमभंगांमुळे मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मधील नियम ५३, ५५, ५८ तसेच परवान्याच्या अटी क्रमांक ४ व ५ चे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. विभागाने २१ ऑगस्ट २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती; मात्र, अनुज्ञप्तीधारकांकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही. खुलासा न मिळाल्याने एकतर्फी निर्णय घेत मे. हॉटेल टू बीएचके यांचा एफएल-३ परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पबचा परवाना 15 दिवसांसाठी करण्यात आला रद्द
15 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री 12 नंतर दारू विक्री केल्याप्रकरणी आठ पबवर केसेस करण्यात आल्या होत्या. मात्र, आठपैकी केवळ टू बीएचके पबचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे. उर्वरित सात पबवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 14 ऑगस्टला मध्यरात्री दीडपर्यंत दारू विक्रीची परवानगी असताना बारानंतर कारवाई सुरू करण्यामागील कारण समजत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
हेदेखील वाचा : Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार






