कल्याण बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. याचरपार्श्वभूमीवर आता बाजारपेठ पोलीसांनी मोठी कारवाई करत एका चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. बाजारपेठ परिसरात मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या चोराला जेरबंद करण्यात पोलीसांच्या हाती यश आलं आहे. कामगाराला बेदम मारहाण करुन करुन त्याची दुचाकी आणि मोबाईल लूबाडणाऱ्या चाेरट्याला बाजारपेठ पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीकांत वाघमारे असे आहे. पोलिस या चोरट्याच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरु आहे.
कल्याण पश्चिमेतील आहिल्याबाई चौकात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी समोरच एका कामगाराला मारहाण करुन लूटण्यात आले. त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले होते. या प्रकरणात कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याचा सुगावा लागला. चोरट्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी प्रेम बागूल, परमेश्वर बावीस्कर, रविंद्र भालेराव, रमाकांत पाटील, राहूल इसी आणि अरुण आंधळे यांनी भिवंडी येथे एका घरात छापा टाकला. या घरात पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी मिळून आला. श्रीकांत वाघमारे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाघमारे हा सराईत चोरटा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.