कर्जत/ संतोष पेरणे : सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारया स्कुल बस क्लीनरने पाच वर्षीय तीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून करण दीपक पाटील वय वर्षे २४ याला वदप गावातून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर सारखी घटना कर्जत शहरात घडली असून कर्जत शहरातून खालापूर तालुक्यातील लोधीवली येथे असलेल्या सेंट जोसेफ शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जात असतात. त्यातील पाच वर्षाच्या तीन मुलींना स्कुल बस मध्ये मागील सीट वर बसवून अश्लील कृत्य करण शिवाजी पाटील करीत होता.एप्रिल २०२४ पासून हा प्रकार सुरु असून त्या मुलींनी आपल्या घरी हा प्रकार सांगितल्यावर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रात्रीच आरोपी तरुणाला पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले होते.त्या तरुणावर पालक वर्गातून आणि समाजातील अन्य लोकांकडून हल्ला होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.मात्र त्या तरुणाला कर्जत न्यायालयात दुपारी आणले असता पालकांनी गाडीतून उतरणाऱ्या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र अशी परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना पोलिसांना असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालय आवारात लावला होता.
न्यायालयाने त्या अल्पवयीन पाच वर्षीय मुलींची लैंगिक छळ करणाऱ्या त्या तरुणाला २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.कर्जत पोलिसांनी हा प्रकार गेली वर्षभर सुरु असलेल्या स्कुल बस देखील ताब्यात घेतली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस उप अधीक्षक डी डी टेले आणि कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली आहे.
कर्जत शहरातील तीन लहान विद्यार्थ्यांची लैंगिक छेड काढणाऱ्या स्कुल बस चा क्लिनर करण पाटील याच्यावर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी आणि अशी कृत्य गेली वर्षभर सुरु असताना शालेने पूर्णपणे डोळेझाक संबंधित प्रकरणी केली असल्याने संबंधित शाळा सेंट जोसेफ स्कुलची मान्यता शासनाने रद्द करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ऍड कैलास मोरे यांनी केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत व घडत आहेत.त्यामध्ये आताच सेंट जोसेफ स्कुल, लोधीवली या शाळेत शिकणाऱ्या कर्जत तालुक्यातील मुलींवर बसमध्ये घडलेला प्रकार हा चुकीचा व गंभीर आहे.सदर कर्जतमध्ये घडलेल्या घटनेची दखल घेऊन संपूर्ण रायगड जिल्हयातील सर्व शाळांची तपासणी करून शासनांचे पालन त्यांचेकडुन होते की नाही याची शहानिशा करून ज्या शाळा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात अशा शाळांची मान्यता त्वरीत रदद करावी. यासाठी जिल्हातील सर्व शिक्षणअधिकारी यांना आदेश देवुन त्याबाबत कार्यवाही सुरू करावी. निवेदनाची दखल न घेतल्यास यापुढे होणा या घटनांस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची स्पष्ट नोंद घ्यावी तसेच आपलेविरूद्ध ञीव आंदोलन छेडावे लागेल याची स्पष्ट नोंद घ्यावी.अशी मागणी सम्यक विद्यार्थी परिषद यांनी केली आहे.