फरार नेर्लेकरच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्याच्याविरोधात इचलकरंजी सह विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले होते. पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.
विविध प्रकारचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नेर्लेकर याच्यावर हुपरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्रप्रदेशातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला अटकही केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यावर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.