नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर... (फोटो सौजन्य: Pinterest)
नांदेड : नांदेडमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील नारायण मोरे (वय 42) यांनी दोन मुलांसह आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, आता याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या दोन चिमुकल्यांचा देखील जीव घेतला. सुनील मोरे यांनी मुलं झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
सुनील नारायण मोरे (वय 42) असे या शिक्षक पित्याचे तर, सारा (वय १३) आणि सुमीत (वय १०) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. दोन वर्षे वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि चौकशांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशिला हे दोघे दाम्पत्य हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदी कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर एक स्टेटसही ठेवले होते. या स्टेटसवरून पुढील तपास करण्यात आला.
दरम्यान, सुनील मोरे यांनी शुक्रवारी सकाळी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात आणि वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा कुठेही उलगडा होऊ नये, यासाठी मुलांची हत्या केल्यानंतर सुनील मोरे यांनी कार थेट गोदावरी नदीत घालून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला आहे.
मानसिक छळाचे आरोप
लॅपटॉपमधील नोटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा, हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी किसन फुले, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता पावले यांचा उल्लेख करून मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप या आरोपांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोदावरीत आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरे यांनी मित्राला फोन केला होता.
शरीरावर अनेक वार
शवविच्छेदन अहवालानुसार, दोन्ही मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाची मदत झाली का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या प्रकरणात मोरे यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्याची आणि विविध अंगांनी तपास करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






