धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्... (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात नागपुरात धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून डोक्यावर सिलिंडर आदळून मित्राची हत्या केली. इतकेच नाहीतर हत्येनंतर त्याचा मृतदेह तब्बल चार दिवस घरातच पडून होता. दुर्गंधी सुटल्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण प्रकार समोर आला.
हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत विहिरगाव परिसरात ही घटना घडली. अनिल मधुकर पवार (वय 36, रा. पिंपळगाव नेर, यवतमाळ, ह.मु. विहीरगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज दळने (वय 44, रा. विहीरगाव) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी मित्र राजू महादेव पवार (वय 34, रा. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येनंतर राजू पवार हा फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला जात आहे. शवविच्छेदनानंतर शनिवारी सायंकाळी मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अनिल त्रिमूर्ती बारमध्ये तर राजूही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दोन दिवसांपासून अनिलच्या खोलीतून दुर्गंध येत होती. शुक्रवारी रात्री पोलिस पाटील प्रमोद कोंगे यांनी मनोज यांच्याशी संपर्क केला. मनोज तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत दुसरे पोलिस पाटील राजू खोरगडेही तेथे पोहोचले होते.
सर्वांनी मिळून दरवाजा तोडला अन्…
सर्वांनी मिळून घराचे दार तोडले. आत जाऊन पाहिले असता मनोज मृतावस्थेत पडून होता. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. अनिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक छोटा सिलिंडर आणि हेल्मेट दिसले. दोघांवरही रक्ताचे डाग होते. सिलिंडर आणि हेल्मेटने डोक्यावर वार करण्यात आले होते.
3 जूनपासून बेपत्ता
चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, अनिल 1 जून पासून कामावरच गेला नाही तर राजू 3 जून पासून बेपत्ता आहे. शेजारी महिलेने सांगितले की, राजू दाराला कुलूप लावून बॅगसह बाहेर जाताना दिसला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून राजूचा शोध सुरू केला आहे.