संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट अत्याचारप्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडे याचा पुर्वइतिहास पाहिल्यानंतर तो महिलांबाबत ‘विकृत’च असल्याचे दिसत असून, एकट्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांचा घात करत लुटमार केल्याचे एकूण गुन्ह्यांतून समोर आले आहे. त्यामुळेच पोलीस त्याने यापुर्वी देखील महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करत असून, त्यादृटीने तपास करत आहेत.
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याच्यावर एकूण ६ गुन्हे नोंद आहेत. या सहाही गुन्ह्यात पिडीत या महिलाच आहेत. यातील एक गुन्हा विनयभंगाचा आहे. तर, स्वारगेटमधील मोबाईल चोरीप्रकरणात देखील त्याने छेडछाड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, त्यात केवळ चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तो एकट्या महिलांना हेरत होता. त्याने सहा घटनांमधील एकट्या महिलांनाच टार्गेट केल्याचे दिसत आहे. त्यांना निर्जनस्थळी नेहून लुटल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. त्यावरून नराधम गाडे याची महिलांबाबत असलेली विकृती दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
एकट्या महिला टार्गेट
दत्तात्रय गाडेची या सहा गुन्ह्यातून गुन्हा करण्याची पद्धत दिसून येते. तो एकट्या महिलांनाच टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. या सर्व गुन्ह्यात त्याने एकट्या महिलांना हेरले आहे. त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने बोलून नंतर गुन्हा केला आहे. तर सर्व गुन्ह्यात त्याने चारचाकीचा वापर केला आहे.
घटना क्रमांक १
अहिल्यानगर सुपा पोलीस ठाणे २०१९, महिला नगरहून पुण्याला येण्यासाठी बसची वाट पाहत थांबली असताना आरोपी तिथे कार घेऊन गेला. त्यांना कुठे जायचे विचारल्यानंतर मीही पुण्याला चाललोय, असे सांगून त्यांना कारमध्ये घेतले. नंतर निर्जनस्थळी नेहून त्यांचा गळा हाताने दाबून त्यांच्याकडील दागिने चोरले.
घटना क्रमांक २
कोतवाली पोलीस ठाणे २०१९, अहमदनगर बसस्थानकात पुण्याकडे येण्यासाठी थांबलेल्या महिलेजवळ जाऊन गाडेने पुणे-पुणे असे आवाज दिला. तेव्हा महिलेला वाटले, गाडे पॅसेंजर घेऊन जात आहे. त्यामुळे महिला गाडीजवळ आली. ती एकटीच होती. त्यामुळे तिने इतर प्रवासी घेणार का, असे विचारले. गाडेने घेणारे असे सांगितल्यानंतर महिला गाडीत बसली. पण, गाडेने कारमध्ये इतरांना न बसवता गाडी दामटली व निर्जनस्थळी नेहून धमकावून महिलेला लुटले.
घटना क्रमांक ३
शिरूर पोलीस ठाणे २०१९, निरा येथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या महिलेला चौफुला येथे सोडतो असे सांगून त्यांना कारमध्ये घेतले. पण, काही अतंर गेल्यानंतर कारचे चाक पंक्चर झाले असे सांगून गाडी निर्जनस्थळी थांबवली. नंतर महिलेला धमकावत त्यांच्याकडील दागिने लुटले.
घटना क्रमांक ४
शिरूर पोलीस ठाणे- २०२०, भाजी विक्रेत्या महिलेच्या स्टॉलसमोर कार उभी करून कारमधूनच बटाटे खरेदीस बोलणी केली. महिला बटाटे घेऊन कारजवळ आली असता आरोपी कारमध्ये नग्न अवस्थेत होता. हे पाहून महिलेने त्याला शब्दांचा मार देऊन गाडीवर दगड घातला. पण, त्याने तेथून पळ काढला होता. नंतर महिन्याभराने पुन्हा आरोपी या पिडीत महिलेकडे आला. तिला पैशांचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली. तसेच, गोळ्या घालण्याची धमकी देखील दिली होती.
घटना क्रमांक ५
शिक्रापूर पोलीस ठाणे-२०२०, न्हावरा फाटा येथे एका महिला शिक्रापूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होती. तेव्हा आरोपी कार घेऊन तिच्याजवळ आला. शिक्रापूरला जायचे का, अशी विचारणा केली. महिलेने हो म्हटल्यानंतर मी, ही शिक्रापूर येथे जात असल्याचे सांगून कारमधून नेले. पण, काही अंतरावर कार निर्जनस्थळी नेहून रिव्हॉलवरच्या धाकाने महिलेचे दागिने लुटले.
घटना क्रमांक ६
शिक्रापूर पोलीस ठाणे २०२० – शिक्रापूरवरून चाकणला जाण्यासाठी यातील तक्रारदार महिला थांबली असताना तिथे गाडेने येऊन ‘कुठे चाकणला जायचे का’, अशी विचारणा केली होती. महिलेने नकार दिला, पण तरी देखील या महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्याकडील दागिने चोरले.
स्वारगेट पोलीस ठाणे २०२४ – स्वारगेट परिसरात दत्तात्रय गाडे याने चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.