चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षांची शिक्षा (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. असे असताना पाच लाख रुपये माहेरून घेऊन ये म्हणत विवाहितेला पेटवून देत निर्घृण हत्या करण्यात आली. 2015 मध्ये हे भीषण हत्याकांड घडले होते. तब्बल 10 वर्षांनी न्याय मिळाला आहे. हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या पती, सासू-सासऱ्यासह दीराला 10 वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ठोठावली.
मृत फरिन बेगम हिचे चुलते शेख शबाबुद्दीन हबीबुद्दीन यांनी फिर्याद दिली. पती वसीमखाँ रसुलखाँ पठाण, सासरा रसुलखाँ गुलाब खाँ पठाण, सासू शकील बी रसुलखॉ पठाण, दीर इम्रान खाँ रसुलखाँ पठाण अशी आरोपींची नावे आहेत. फरिन बेगम हिचे ६ एप्रिल २०१४ रोजी सिल्लोड येथील वसीम खाँ याच्याशी लग्न झाले होते. विवाहानंतर सासरचे लोक ‘तू आम्हाला पसंत नाही, तुझ्यापेक्षा आम्हाला चांगली मुलगी भेटली असती, तुझे माहेरचे लोक भिकारी आहेत’, असे टोमाणे मारत होते. त्यातच पतीच्या नोकरीसाठी माहरेहून पाच लाख रुपये आण अशी वारंवार मागणी सुरू होती. पैसे न आणल्यास काडीमोड देण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
दरम्यान, सासरे रसूलखान पठाण याने २१ जुलै २०१५ रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजता तिचे हात पकडले तर नणंद आसमा हिने दोन्ही पाय पकडले. पती वसीम, सासू शकीला, दीर इमरान आणि दुसरी नणंद नफिसा पठाणने तिच्यावर रॉकेल ओतले आणि काडी पेटवून तिला पेटवून दिले, अशी माहिती भाजलेल्या अवस्थेत तिने रुग्णालयात असताना काकांना सांगितली.
उपचार सुरु असताना झाला मृत्यू
उपचार सुरु असताना तिचा त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. प्रकरणात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. गाढे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनीलकुमार बर्वे आणि सुर्यकांत सोनटक्के यांनी १६ साक्षीदार तपासले.