तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन (File Photo : Suicide)
शिरपूर जैन : अकोल्यातील वाघळूद येथे एका नराधमाने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी (दि. 21) घडली. याप्रकरणी रविवारी (दि.22) मिळालेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिषेक विष्णू देशमुख (वय 25, रा. वाघळूद) असे आरोपीचे नाव आहे. अभिषेकने अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिला बाहुपाशात कवटाळले. ‘माझ्यासोबत पळून चल. जर तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझी बदनामी करेन’ आणि जीवाने मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी व त्रासाला कंटाळून सदर अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले. त्यानंतर उपचारासाठी तिला दवाखान्यात दाखल केले असता वाशिम येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : जळगाव हादरलं! दारुड्या मुलाच्या त्रासाने जन्मदात्याने केली हत्या, मृतदेह रस्त्यावर टाकून बनाव…
दरम्यान, सोमवारी रात्री मृत मुलीच्या काकाने शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अभिषेकविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण करीत आहे.
मुलासह आईची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.