सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मालक व मॅनेजर अशा चार जणांना अटक केली आहे. तर, १८ कर्मचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान त्यामध्ये स्काय हाय तोलुशन या कंपनीचा मालक सागर कुमार यादव (वय ३२, रा. हिंजवडी), मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (वय २९, रा. वृंदावन सोसायटी, वाघोली) तसेच, टेक लॉ सोलुशन कॉल सेंटरचा मालक धनंजय साहेबराव कासार (वय २५, रा. माण, ता. मुळशी) व मॅनेजर हर्षद शंकर खामकर (वय २८, रा. सेल पेट्रोल पंपाजवळ, हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, या दोन्ही कॉल सेंटरमधील एकूण १८ कर्मचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत हिंजवडी भागात वेगवेगळे बनावट कॉल सेंटर असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार
चौबे यांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट दोनची दोन पथके तयार करुन संबधीत कॉल सेंटरवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार, सायबर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने हिंजवडी टप्पा येथील दोन वेगवेगळ्या अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकला.
या दोन्ही कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरीकेतील नागरीकांशी वेगवेगळ्या नावाने इंग्रजीमध्ये अमेरिकेतून मेडीकल हेल्थ डिपार्टमेंट बोलत असल्याचे सांगून काही औषधांमुळे कॅन्सर होतो, असे सांगत ही औषधे वापरणार्या व्यक्तींची कॉलद्वारे माहिती घेत असत. तसेच, त्यांना सबंधित कंपनी विरोधात कोर्टात जाण्यासाठी व त्यामधून चांगले कम्पेंसेशन मिळवून देण्याचे आमीष दाखवून त्यांची माहीती अमेरिकेतील लॉ फर्मला दिली जात असे. त्यानंतर लॉ फर्म कडून डॉलर स्वरुपात कमिशनची रक्कम प्राप्त करण्यात येत होती.






