"गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या...", लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local Crime News in Marathi : मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो नागरिक लोकलमधून प्रवास करत असतात. मात्र काही हुल्लडबाज तरुणांमुळे लोकलमधील प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं.महिलांचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात. याचदरम्यान मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दादर रेल्वे स्थानकावर एका ६२ वर्षीय आरोपीने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलधील १९ वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीजी मखाण असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. मखाण दिल्लीचे रहिवासी असून तहसीलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर पोहोचली. त्यावेळी पीडिता आणि तिची मैत्रिण खाली उतरत होत्या. त्यावेळी डब्यात खूप गर्दी होती.
पोलिसांना दिलेल्या माहितीत तरुणीने सांगितले की, “आरोपीने गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.” या घटनेनंतर तरुणीने दादर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय न्यायिक संहितेअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. त्याला रेल्वे कोर्ट हजर केले असून कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी सांगितले की तक्रारदार तरुणी ही विद्यार्थीनी आहे. आरोपी डीजी मखाण याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
दुसरीकडे, वंशवादातून एका शीख महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी एका एकाला अटक केली. बलात्काराच्या संशयातून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ३० असून, त्याने वंशवादाने प्रेरित होऊन हल्ला केल्याने चौकशीचा भाग म्हणून ती व्यक्ती अजूनही ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्स भागात कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. पीडित महिला २० वर्षांची असून, तपास सुरू असतानाही तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.