File Photo : Murder_Crime
वाशिम : शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांडस येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. महेश रुपराव हाडे (वय 35, रा. गोहगाव हाडे) असे तरुणाचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. 9) घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृतकाच्या भावाने सोमवारी (दि. 10) शिरपूर पोलिसात तक्रार दिली आहे.
गोहगाव हाडे येथील एका 27 वर्षीय विवाहित तरुणीचे शिरपूर पोलिस ठाण्यात हद्दीतील ग्राम चांडस हे माहेर आहे. सासरच्या गावातील महेश हाडे या विवाहित व्यक्तीसोबत तिचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. यादरम्यान ते वेळोवेळी मोबाईल फोनवर बोलत असायचे व भेटतही होते. सदर प्रेमसंबंध तिच्या पतीला माहीत झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच यातील विवाहिता चांडस येथे तिच्या माहेरी आली होती. त्यादरम्यान रविवारी (दि.9) तिने तिच्या प्रियकराला रात्री 11 वाजता फोन करून भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार, महेश रात्री गोहगाव हाडे येथून रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकीने (एमएच 37-0829) तिला भेटायला आला होता.
दरम्यान, मध्यरात्रीपर्यंत तो घरी परत न आल्याने महेशच्या पत्नीने रात्री दोनच्या सुमारास पतीच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तो फोन उचलून हा व्यक्ती चांडस मेहकर रोडवर रस्त्याच्या बाजूला पडलेला असल्याचे सांगितले. महेशचा भाऊ सोमवारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर महेश हाडे हा मृतावस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.
बेदम मारहाण केल्याने मृत्यू
महेशच्या शरीरातून, तोंडातून रक्त वाहत होते व छातीवर, पाठीवर मारही होता. महेशचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने व तो राग मनात धरून माहेरच्या व सासरच्या लोकांनी संगनमत करून महेशला बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले, अशी तक्रार संतोष रुपराव हाडे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध विविध कालमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
5 जणांना केली अटक
प्रेम प्रकरणातून तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. संतोष मारोती मुठाळ, प्रवीण रमेश खेत्री, मारोती शंकर मुठाळ, जीवन भागवत ठाकरे, अश्विनी नरेंद्र लादे यांचा समावेश आहे. घटनास्थळाला एसडीपीओ नवदीप अग्रवाल, शिरपूर येथील ठाणेदार रामेश्वर चव्हाण, पीएसआय रविंद्र ताले, पीएसआय इमरान खा पठाण यांनी भेट दिली.